नागपूर : शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यासाठी मृग बहार मधील संत्रा व मोसंबी या फळपिकांसाठी शासनाने हवामानावर आधारित पिक विमा योजना राबवित आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षामध्ये मृग व आंबीया बहाराकरिता जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी फळपिकाकरिता अधिसूचति क्षेत्रामध्ये योजना राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याकरिता (मृग बहार) संत्रा पिकाकरिता 14 जून आणि मोसंबी पिकाकरिता 30 जून 2022 अंतिम तारीख आहे. 


मृग बहार योजना


हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभाग घेण्यास इच्छुक नसेल तर त्यांनी संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणेबाबत घोषणापत्र लेखी कळविणे बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रातील फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के व त्यावरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी भरावा लागणार आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एका हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. उत्पादनक्षम फळबागांना (संत्रा व मोसंबी 3 ) विमा संरक्षणाचे कवच लाभणार आहे. फळपिकाखाली 20 हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे, अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार आहे. 


योजनेसाठी 'हे' आहेत पात्र 


मोसंबी फळपिकाकरिता जिल्ह्यातील नागपूर (ग्रा.), काटोल, नरखेड, सावनेर व कळमेश्वर तालुके तर संत्रा फळपिकाकरिता नागपूर, कामठी, हिंगणा, रामटेक,पारशिवनी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर व कुही तालुक्याचा समावेश आहे.