Sanjay Shirsat : जमिनींचा व्यवहार, मुलाचे लफडे, आयकरची नोटीस अन् पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ; संजय शिरसाटांचा पाय रोजच्या रोज खोलात
Sanjay Shirsat Controversy History : गेल्या काही दिवसांपासून शिंदेंचे शिवसेने आमदार आणि मंत्री वादात सापडले आहेत. आता मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई : आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ... एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अडचणीत सापडले आहेत. शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला.
हा व्हिडीओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा पाय रोजच्या रोज खोलात जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध, नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. आता बेडरुममधील पैशांच्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, संजय शिरसाट हे या आधी कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत आलेत ते पाहुयात,
1) शिरसाटांकडून संभाजीनगरातील वीट्स हॉटेलच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. मुळात हॉटेलची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असताना शिरसाटांसाठी लिलावात किंमत कमी दाखवल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला. कंपनी लिलावात सहभागी होण्यास पत्र नसल्याचाही दावा त्यांनी केला होता.
2) शेंद्रा एमआयडीसी मूळ जमिनीचा हेतू ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागा होती. मात्र आरक्षण बदलून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावे जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला.
3) छत्रपती संभाजीनगर शहरालगत वर्ग 2 ची जमीन नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप संजय शिरसाटांवर आहे. कोट्यवधीची जमीन कवडीमोल किमतीत घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे.
4) शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवरील जमीन शिरसाटांनी अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
5) मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले. सिद्धांतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर त्या महिलेने ते आरोप मागे घेतले. हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं.
ही बातमी वाचा:























