छत्रपती संभाजीनगर : महानगरात अपघाताच्या घटना सातत्याने घडतात, रात्रीच्या अंधारात बड्या बापाची लेकरं भरधाव वेगाने गाडी चालवत पादचाऱ्यांना किंवा इतर वाहनांना धडक देत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर (Accident) सर्वासामान्यांचा संतापही पाहायला मिळाला. मात्र, आता छ. संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाच्या मुलाला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. शहराजवळील वाळूज महानगर येथे मिठाई आणण्यासाठी बुलेटवर निघालेल्या उद्योजकाच्या मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या टाटा पंच ईव्ही कारने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतरही मदत करण्याऐवजी कारमधील चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी संबंधित चौघांविरोधात पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे
उद्योजक निलेश कुंदे यांचा मुलगा ओम कुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 6 जून 2025 रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ते मिठाई आणण्यासाठी बुलेट (MH20HE3461) वरुन जात होते. सिडको एरिया, MSCB ऑफिसजवळ चेतन बिर्याणीसमोरील मुख्य रस्त्यावरून जाताना कॅफे इलेव्हनकडून आलेल्या भरधाव टाटा पंच EV (MH20GV4919) या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कुंदे कारच्या बोनेटवर आदळून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, डोळ्याजवळ, पाठीला आणि हातपायांना गंभीर दुखापत झाली. मात्र, या अपघातानंतर कारमधून उतरलेल्या चौघांनी चक्क बुलेटवरील निलेश कुंदे यांनाच मारहाण केली. ज्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन लोकेश मुथा हाच कार चालवत होता, त्याने मदतीऐवजी कुंदे यांना मारहाण केली. यावेळी अपघाताचे साक्षीदार ऋषी पोपळे यांनी हस्तक्षेप करताच त्यालाही मारहाण करण्यात आली.
दरम्यान, गर्दी जमू लागल्याने आरोपींनी कारमधील बिअरच्या बाटल्यासह पळ काढला. या घटनेनंतर वाळूज परिसरात तणावाचे वातावरण होते, तसेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.