जालना : सगळीकडे दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळत असून, फटाक्यांची खरेदी सुद्धा सुरु आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांकडून देखील फटाके खरेदी करण्यात येत आहे. अशातचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील आपल्या नातवांसह भोकरदनमधील एका दुकानात जाऊन फटाक्यांची खरेदी केली. दरम्यान, यावेळी 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी कोणता फटाका कोणत्या नेत्यासाठी असं विचारल्यावर दानवे यांनी भन्नाट उत्तर दिली.
कोणाला कोणता फटाका देणार?
देवेंद्र फडणवीस (सुतळी बॉम्ब) : देवेंद्र फडणवीस म्हणजे सुतळी बॉम्ब आहे. कधी कोणावर जाऊन पडेल आणि कोणाचे काय नुकसान करतील सांगताचं येणार नाही. त्यामुळे आमच्याजवळ तो सुतळी बॉम्ब आहे असं दानवे म्हणाले.
नरेंद्र मोदी (रॉकेट) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रावर रॉकेट पाठवलं आहे. जगातून आतापर्यंत कोणीच जिथे गेलं नाही तिथे मोदींनी रॉकेट पाठवले. त्यामुळे सध्या राजकारणातील रॉकेट मोदी हे आहेत, असं दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरे (फुसका फटाका) : उद्धव ठाकरे म्हणजेच फुसका फटाका आहे. त्यामुळे फुसका फटाका उद्धव ठाकरे यांच्यासाठी घेणार असल्याचे दानवे म्हणाले.
संजय राऊत (बिना वातीचा फटाका) : दरम्यान याचवेळी संजय राऊत यांच्यासाठी कोणता फटाका घेणार, यावर बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, राऊत यांच्यासाठी विना वातीचा फटाका घेणार. वातच काढून घेतल्यास फटाका कधीच वाजत नसतो, असे दानवे म्हणाले.
अजित पवार (तोट्या फटाका): अजित पवार यांच्यासाठी आपण तोट्या फटाका घेणार. कारण, हा फटाका आवाज देत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण तोट्या फटाका घेणार असल्याचे दानवे म्हणाले.
शरद पवार (डबल आवाज फटाका) : शरद पवार यांच्यासाठी आपण दोन वातीचा फटाका घेणार आहे. कारण, कोणत्या वातीचा कोठून आवाज येईल, आणि कोठून येणार नाही याबाबत काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी डबल आवाज फटाका घेणार असल्याचे दानवे म्हणाले.
राहुल गांधी (सुरसुरी) : राहुल गांधी यांच्यासाठी जर फटाका खरेदी करायचा असेल तर, लहान मुलं खेळतात ती सुरसुरी विकत घेईल. त्यांच्यासाठी सुरसुरी योग्य आहे. आवाज कधीच निघत नाही, फक्त चमकत असतो, असे दानवे म्हणाले.
नारायण राणे (दगडी फटाका) : नारायण राणे म्हणजे फार जुना फटाका आहे. राणे म्हणजेच दगडी फटाका आहे. एकदा दगडावर ठेवला आणि वरून हाणला की चुराच होतो, असे दानवे म्हणाले.
स्कायशॉट : फटाक्यांच्या यादीत असलेला स्कायशॉट आमच्या काळात नव्हता. त्यामुळे राजकारणात नवीन आलेला आणि एकदम चमकणारा नेताच सध्या मला कुणी दिसत नाही. काही लोकं आहेत, पण ते अजून नेते नाहीत, असे दानवे म्हणाले.
आमच्या काळात आम्ही स्वतः फटाके फोडायचो
माझ्या मुलांनी कधीच मला फटाके मागितले नाहीत. त्या काळात मी कधीच दुकानात जाऊन फटाके खरेदी केली नाही. मुलांसोबत घरातील मंडळी फटाके खरेदी करण्यासाठी येत होते. पण आता नातवंडे असून, फटाके खरेदी करण्यासाठी ते आग्रह करतात. त्यामुळे मुद्दामहून मी आज फटाके खरेदीसाठी दुकानात आलो आहे. आमच्या काळात आम्ही स्वतः फटाके फोडायचो. त्यामुळे कधी हात जळायचे, कधी वाफ तोंडाला लागायची. त्यावेळी फटाके लगेच फुटायचे. सुरसुरी पेटवून तिला झाडावर फेकायचो, असे अनेक प्रसंग आमच्यासोबत घडले असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Supriya Sule : अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं