छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली. त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशीम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखवला तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले.
मात्र, त्यानंतरही पोट दुखतच राहिले अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले. तेव्हा तपासणी अंतिम सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
वाशिम सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली
वाशिमच्या सरकारी रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्हा रुग्णालयात 19 मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. डॉक्टरांनी या घटनेमागे "तांत्रिक बिघाड" असल्याचे सांगत ती अनावधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.