Nashik TCS Conversion Case :नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर छत्रपती संभाजीनग महापालिकेने बुलडोझर कारवाई केली. मतीन पटेल यांचे बांधकाम हे अवैध असल्याचा ठपका ठेवून 100 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat० यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

या कारवाईनंतर इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. एवढ्या तक्रारी करूनही सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या कथित अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Imtiaz Jaleel Statement : सत्ताधारी नगरसेवकांवरही समान कारवाईची मागणी

इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्या नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयावर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या मालमत्तांवरही व्हायला हवी. अनेक महिन्यांपासून संबंधित तक्रारी आणि अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

मतीन पटेल यांचे बांधकाम अनधिकृत असल्यास कारवाईबद्दल आम्हाला आक्षेप नाही. मात्र इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार, यावर आमचे लक्ष आहे. संबंधित पुरावे महापालिकेला देण्यात आले असून आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचेही जलील यांनी सांगितले.

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले की, "मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. शहराचे दुर्दैव म्हणजे आम्हाला इतका भ्रष्ट नेता मिळाला आहे. त्यांनी मला ‘अर्बन दहशतवादी’ म्हटले. त्यावर माझे एकच उत्तर आहे की त्यांनी ‘टेरेरिस्ट’चे स्पेलिंग लिहून दाखवावे. पालकमंत्र्यांनी अनावश्यक वक्तव्ये करू नयेत. त्यांनी माझ्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची असेल तर जरूर करावी. त्याचबरोबर मी केलेल्या आरोपांचीही चौकशी करावी. चौकशी लागल्यास ते काही महिन्यांत हर्सूल जेलमध्ये दिसतील."

Municipal Commissioner Response : आयुक्तांचे स्पष्टीकरण

महापालिका आयुक्तांनी सांगितले की, इम्तियाज जलील यांनी दिलेली कागदपत्रे तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल. मतीन पटेल यांच्या प्रकरणात आठ दिवसांपूर्वी तक्रार प्राप्त झाली होती आणि सर्व कारवाई नियमानुसार करण्यात आली. इतर नगरसेवकांच्या प्रकरणांमध्ये संबंधित झोनल अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल अद्याप प्राप्त न झाल्यामुळे विलंब झाला. अतिक्रमण आढळल्यास त्यांनाही नोटीस देऊन नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Matin Patel Demolition : गांधीगिरीचा प्रयत्नही निष्फळ

कारवाईदरम्यान मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी मनपा पथकाचे फुलांच्या माळा आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या कारवाईत कोणताही बदल झाला नाही. या कारवाईविरोधात मतीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र खंडपीठाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही आणि कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेने बांधकामावर बुलडोझर चालवला.

Political Controversy : कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले

निदा खान प्रकरणातील या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा मुद्दा पुढे आला आहे, तर दुसरीकडे निवडक कारवाईचे आरोप करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ही बातमी वाचा: