Chhatrapati Sambhajinagar: परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन; शिक्षकाला नातेवाईकांसह संस्था चालकाकडून चोप, नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar: विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: सध्या सुरू असलेल्या १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
घडलेला प्रकार विद्यार्थिनीने तत्काळ घरातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी संस्था चालकासमोर संबंधित शिक्षकाला बोलावले. त्यावेळी त्याने चूक झाल्याचे कबूल केल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याला चोप दिला. संबंधित शिक्षकाने माफी मागितल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर विद्यार्थिनींकडूनही माहिती घेतली जात आहे. गैरवर्तनाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शिक्षणसंस्थेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा आणि शिस्तीबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, असा दावा संस्थेकडून करण्यात आला असून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

























