छत्रपती संभाजीनगर: नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात (TCS Crime Case) आरोपी असलेली निदा खान (Nida Khan) ही संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळं मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात सहआरोपी केले आहे. निदा खानला पोलिसांनी मतीन पटेल यांच्या फ्लॅटमधून अटक केल्यापासून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांना मोठा दणका दिला आहे, त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधले आहे. त्या घराला महापालिकेने नोटीस दिली असून त्यांच्या घरावर देखील महापालिकेने नोटीस चिटकवली आहे. परिणामी 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरे राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसलाही अतिक्रमणाचा नोटीस बजावण्यात आली आहे, त्याचबरोबर त्यांचे नगरसेवक पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.
AIMIM Matin Patel: नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला पोलिसांच्या पासून लपवणे महागात पडण्याची शक्यता आहे. कारण अनधिकृत बांधकाम करणे भोवणार आहे. त्याचबरोबर मतीन यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच महापौर समीर राजूरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पालिका कायदा 10- 1 ड नुसार कारवाई होऊ शकते, असं महापौरांनी सांगितलं आहे. तर महापौरांच्या या वक्तव्यावरती महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते समीर बिल्डर यांनी म्हटलं की, मतीन पटेल यांना नगरसेवक हे महापौर यांनी बनवलं नाही तर नारेगावच्या जनतेने बनवलं आहे. त्यामुळे महापौर हे कोणाचं नगरसेवक पद रद्द करू शकत नाहीत .घराला नोटीस दिली आहे त्यावर कायदा आहे आम्ही कोर्टात जावू.
AIMIM Matin Patel: एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल कोण?
मतीन पटेल हे संभाजीनगरमधील प्लॉटिंग व्यवसायिक असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एमआयएम पक्षात सक्रिय आहे. ते इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीत एमआयएमने प्रभाग क्रमांक 9 मधून मतीन पटेल आणि त्याच्या बहिणीला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मतीन पटेल यांनी कलीम कुरेशी यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर मतीन आणि त्यांची बहीण दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले होते. तसेच मनपा निवडणुकीदरम्यानही त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते.
AIMIM Matin Patel: नगरसेवकाचा 'तो' फ्लॅट अन् निदाचा मुक्काम
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान (Nida Khan) 40 दिवसांपासून फरार होती, पोलिसांची अनेक पथकं तिचा शोध घेत होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.
