Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सहाय्यक प्राध्यापकानेच बलात्कार (Rape) केल्याची घटना मंगळवारी (25 एप्रिल) रोजी उघडकीस आली होती. अशोक गुरप्पा बंडगर असे आरोपी सहाय्यक प्राध्यापकाचे नाव असून, त्याच्याविरोधात बेगमपुरा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता विद्यापीठ प्रशासनाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत कुलगुरुंच्या आदेशाने अशोक बंडगरला निलंबित केलं आहे. सोबतच या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.
वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पीडित विद्यार्थिनीला घरी पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास अशोक बंडगर आणि त्याच्या पत्नीने जागा दिली. मात्र पुढे घरी राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापक असलेल्या अशोक बंडगरने आपल्या पत्नीच्या सहमतीने बलात्कार केला. एवढंच नाही तर सहाय्यक प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीने संगनमताने माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोघेही फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई...
दरम्यान पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर प्राध्यापक डॉक्टर अशोक बंडगर विरोधात विद्यापीठ प्रशासनाने देखील निलंबनाची कारवाई केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने कुलसचिव उप कुलसचिव आणि विधी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुलगुरुंच्या आदेशाने बंडगरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक अशोक बंडगर यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी तात्काळ काढले आहेत. या संदर्भात स्वतंत्र खातेनिहाय चौकशी तसेच विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे अस्थापना विभागाने कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी देखील केला होता विद्यार्थिनीवर अत्याचार
दरम्यान बंडगरबाबत आणखी एक माहिती समोर येत असून, त्याने 2019 मध्ये देखील त्याने पश्चिम बंगालच्या एका विद्यार्थिनीवर आपल्या पदाचा गैरवापर करुन अत्याचार केला होता. याबाबत पीडित मुलीने कुलगुरु यांची भेट घेऊन, घडलेच्या प्रकाराची माहिती दिली होती. यावेळी कुलगुरू यांनी तिला तक्रार देण्यासाठी सांगितले होते. मात्र मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार देण्यासाठी नकार देत, पीडित मुलीचा प्रवेश रद्द करुन घरी घेऊन गेले. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नव्हते.
इतर महत्वाच्या बातम्या: