Chhatrapati Sambhaji Nagar News : दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. मात्र असे असताना शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठणमधील शरद साखर कारखान्यात (Sharad Sugar Factory) मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) आरोप झाल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा (Ambadas Danve) दावा फुसका बार ठरला असल्याची चर्चा आहे. 


काय म्हणाले होते दानवे? 


रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शरद सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीने चालवता, हे आम्हाला माहित असल्याचे दानवे म्हणाले होते. हा कारखाना कुणालाही चालवायला दिला नाही, तरीही या कारखान्यातून मनी लॉंड्रिंगचा प्रकार सुरु असल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. तर या प्रकरणाचे  सर्व पुरावे काही दिवसांत बाहेर येतील. भुमरे यांच्या या कारखान्यात कुणाचा पैसा येतो आणि कुणाला पैसा दिला जातो. साखर कोण विकतं आणि साखर कोण खरेदी करतं, याचा सगळा तपशील माझ्याकडे असून, एक दिवस सभागृहात मांडल्याशिवाय राहणार नाही, असे दानवे म्हणाले होते. 


विशेष म्हणजे संदिपान भुमरे यांच्यावर आरोप करताना आपल्याकडे या प्रकरणाचे सर्व पुरावे असल्याचे दानवे म्हणाले होते. तसेच माध्यमांच्या समोर आपण ते देणार नसल्याचे दानवे म्हणाले होते. मात्र त्यांच्या आरोपानंतर हे दुसरे अधिवेशन होत आहे. तरी देखील अजूनही दानवे यांनी या मुद्यावर एकही शब्द काढला नसल्याने, त्यांचा दावा फुसका बार ठरला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता यावर अंबादास दानवे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


'त्या' 17 कारखान्यात नंबर लागणार का? 


दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर माझ्याकडे एकूण 17 कारखान्यांतील घोटाळ्यांची प्रकरणं असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तर 17 कारखान्यापैकी हे पहिलं प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या 17 कारखान्यांमध्येच भुमरे यांच्या शरद साखर कारखान्याचा तर नंबर नाही ना? अशीही चर्चा पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Hasan Mushrif : तब्बल 52 तास नॉट रिचेबल असलेले आमदार हसन मुश्रीफ थेट कागलमध्ये दाखल! ईडीच्या नोटीसवर दिली पहिली प्रतिक्रिया