Kabutar Khana : धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालणार; कबुतरखान्याच्या राड्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Dadar Kabutar Khana : दादरच्या कबुतरखान्यासंबंधी जे मार्ग आमच्यासमोर आहेत ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरुन इतक्या वर्षांची परंपरा खंडित होणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : मुंबईतील दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरुन जैन समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आंदोलकांनी कबुतारखान्याची ताडपत्री काढली. यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
परंपरा खंडित होणार नाही
दादरच्या कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे धार्मिक आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
यावर काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहेत. ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे, तीदेखील खंडित होणार नाही आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण होणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दादरच्या कबुतरखान्यावरुन जैन समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या कबुतरखान्यावर महापालिकेने ताडपत्री टाकली होती. ती जैन समूदायाच्या आंदोलकांनी काढली, त्याचे बांबूही तोडण्यात आले. त्यानंतर हा कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
जनता विरोधकांवर विश्वास ठेवणार नाही
उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सर्व जागांवर तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला असे वाटते की, विरोधी पक्ष कन्फ्युज आहेत. कोण काय करावं कुणाला समजत नाही. कुणाचा ताळमेळ कुणाच्या पायात नाही. सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात. जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही."
दिल्लीत एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेते आपल्या सहकाऱ्यांना भेटत आहेत. शिंदेसाहेब पीएम साहेबांना भेटतायेत आणि उद्धवजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटत आहेत असं फडणवीस म्हणाले.
ही बातमी वाचा:























