छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष कामाला लागले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघात देखील अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. पण अशातच हा मतदारसंघ महायुतीत आपला ताब्यात घेण्यासाठी भाजपसह शिंदे गटाकडून दावे केले जात आहे. दरम्यान, असे असतानाच आता शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आदेश दिले तर मी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे वक्तव्य प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर, "या मतदारसंघातून भाजपने उमेदवार द्यावा, भाजपची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. शिवाय शिवसेनेत दोन गट झाल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा या मतदारसंघातून सहज विजय होऊ शकतो,” असा दावा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला होता. पण असे असताना या मतदारसंघावर शिंदे गटाने पुन्हा दावा सांगितला आहे. यापूर्वी पालकमंत्री संदीपान भुमरे हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. त्यात आता जैस्वाल यांनीही निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवल्याने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले जैस्वाल?
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार आमदार जैस्वाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा उमेदवार लवकरात लवकर ठरवावा, जेणेकरून त्याला वर्षभर मतदारसंघात फिरून तयारी करता येईल, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच ज्या जागा आधीपासून शिवसेनेकडे होत्या, जिथे आमचे खासदार आहेत, त्या जागा आम्हीच लढवणार यात शंका नाही. या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जाहीर करतील. मी 1996 ते 1998 या कालावधीत खासदार म्हणून लोकसभेत निवडून आलो आहे. मतदारसंघाची मला माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मी पुन्हा लोकसभा लढवायला तयार आहे, असे आमदार जैस्वाल म्हणाले आहेत.
भाजपकडून देखील तयारी...
एकीकडे शिंदे गटाकडून सतत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असताना, दुसरीकडे भाजप देखील या जागेसाठी इच्छुक आहे. या मतदारसंघातून भागवत कराड यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कराड यांचे जिल्ह्यातील दौरे देखील वाढले आहे. सोबतच, महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपला सोडण्यात यावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचा देखील भागवत कराड म्हणाले होते. तसेच याबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही कराड म्हणाले होते. तर, या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील लोकसभेच्या तयारीला लागले असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: