Chhatrapati Sambhajinagar: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) छत्रपती संभाजीनगर मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या घरकुल सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक अर्जदार 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Continues below advertisement


किती सदनिकांसाठी निर्णय?


म्हाडाच्या या सोडतीत एकूण 1323 सदनिका आणि 18 भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 1148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत 154 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतून 21 सदनिका समाविष्ट आहेत.


घरांच्या अर्जासाठी नागरिकांना https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन IHLMS 2.0 प्रणालीवर नोंदणी करावी लागणार आहे. ही प्रणाली 30 जून 2025 रोजी उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली होती.


अंतिम यादी 16 सप्टेंबरला जाहीर होणार


सोबतच, अर्जासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम RTGS/NEFT द्वारे 1 सप्टेंबर 2025 पर्यंत भरता येणार आहे. प्राथमिक यादी 8 सप्टेंबरला, अंतिम यादी 16 सप्टेंबरला जाहीर केली जाईल. 26 सप्टेंबर 2025 रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालय, संभाजीनगर येथे होणार आहे. 


या वेळच्या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नक्षत्रवाडी येथील (संकेत क्र. 259) योजनेतील सामाजिक आरक्षण वगळता इतर सर्व आरक्षणे रद्द करण्यात आली असून, त्या सदनिका सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. चिकलठाणा (संकेत क्र. 261) येथील सदनिकांची संख्या पूर्वी 158 होती, ती आता 148 करण्यात आली आहे.


PMAY योजनेंतर्गत अर्ज करताना नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक नाही; मात्र सोडतीत यशस्वी झाल्यास ते सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय, अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला 2024–25 या आर्थिक वर्षासाठीच ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.