Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: मागील सहा महिन्यांपासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंग धुमाकूळ सुरुच आहे. कोयता गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत असल्याचे चित्र आहे. आता छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील 'कोयता गॅंग'ची (Koyta Gang) दहशत पाहायला मिळत आहे. मुकुंदवाडीतील छत्रपतीनगरमध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वॉचमनवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली असून एका शिक्षकासह त्यांच्या नातेवाइकालाही लुटण्यात आलं आहे. तर या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिक्षक असलेले रमेश गंगाराम नरहिरे यांनी नुकतेच मुकुंदवाडीतील छत्रपतीनगरमध्ये घर विकत घेतले आहे. त्यामुळे त्यांनी घराचे नुतनीकरण सुरू केले. दरम्यान शुक्रवारी रात्री 09.15 वाजता रमेश नरहिरे आपल्या पत्नीसह  नातेवाईक परशुराम पाटेकर यांच्यासह घरासमोर गप्पा मारत उभे होते. यावेळी वॉचमन अशोक बळीराम इरफे देखील तिथे उपस्थित होते. याचवेळी अचानक तेथे दोन तरुण आले. यातील एकाच्या हातात कोयता होता. 


विशेष म्हणजे कोणतेही कारण नसताना दोघेही रमेश यांना शिवीगाळ करू लागले. तर यातील एकाने रमेश यांच्या खिशात हात घालून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वॉचमन अशोकने त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्याने दुसऱ्याने कोयत्याने अशोकच्या हातावर वार केला. या हल्ल्यात वॉचमन  अशोक बळीराम इरफे गंभीर जखमी झाले. त्यानंतर कोयत्याची भीती दाखवून लुटारूंनी रमेश यांच्या खिशातील 1800 व पाटेकर यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले.


मोटारसायकलीचेही कोयत्याने तोडफोड 


मारहाण करून पैसे लुटल्यावर देखील लुटारू थांबले नाही, तर गल्लीतील प्रशांत बागूल हे दुचाकीने तेथे आले असता त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली. तर जाताना पाटेकर यांच्या मोटारसायकलीचेही कोयत्याने नुकसान करीत दहशत माजविली. तसेच यावेळी जमलेल्या लोकांना धमकावत लुटारु पसार झाले. या घटनेनंतर रमेश नरहिरे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 


लुटमारीच्या घटनांनी दहशत 


छत्रपती संभाजीनगर सामान्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना एकापाठोपाठ घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सिडको एन-2 येथे शुक्रवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या काही तासात वॉचमनवर कोयत्याने वार करून शिक्षकासह त्यांच्या नातेवाइकाला लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


koyta gang : कोयता गॅंग इज बॅक! 'आम्ही या एरियातील भाई', कोयता गॅंगची पुन्हा दहशत; चार जण अटकेत