Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या बिडकीन गावात एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बिडकीन येथील शेकटा रोडवर असलेल्या गोडाऊनला नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बिडकीन पोलीस आणि अग्निशमक दलाचे बंब दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.


बिडकीन गावातील शेकटा रोडवर असलेल्या एका गोडाऊनला रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या वस्तू आणि ड्रम असल्याने आगीचे प्रमाण अधिकच वाढत आहे. तर आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळावर खासगी टँकर आणि अग्निशामक दलाच्या बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र जोराचा वारा सुरू असल्याने आगीचा भडका अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्यांना बोलवण्यात आले आहे. मात्र आगेची भीषणता अधिक असल्याने आग आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


घटनास्थळी पोलीस दाखल


बिडकीन गावातील शेकटा रोडवर एका गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलिसांनी जमावाला दूर पांगवत अग्निशामक दलाला माहिती दिली. तसेच अजूनही पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी पाहायला मिळत आहे. तर आगीची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


घटनास्थळी मोठा जमाव!


शेकटा रोडवरील गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांकडून अग्निशामन दलाला मदत केली जात आहे. यावेळी अनेक नागरिकांनी खाजगी टँकर बोलून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आगीची भीषणता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवून कठीण होत आहे. त्यामुळे आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी बोलवण्यात आल्या.