छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण तापले असतानाच आता याचे पडसाद साहित्य संमेलनात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात मराठा आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या आणि मराठा आंदोलनाचा मुद्दा मांडल्याचे पाहायला मिळाले. तर, मराठा समाजासाठी वेळ पडल्यास आम्ही राजीनामे द्यायला तयार असल्याचं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना ठाले पाटील म्हणाले की, "मराठवाड्यातील सर्वच मराठे हे कुणबी आहेत. मराठवाड्यातील आणि विदर्भातील मराठ्यांची नातेसंबंध आहेत. ते जर कुणबी असतील तर मराठवाड्यातील मराठे कुणबी कसे नाहीत. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीत. विदर्भातील वंशजांना आरक्षण मिळते, पण मराठवाड्यात मिळत नाही. यांची मुली तिकडे आणि त्यांच्या मुली इकडे दिल्या आहेत. पण आरक्षण मिळत नाही, हा कुठला न्याय आहे. नीट लक्षात घेतलं तर राजकीय पक्ष लक्षात घेत नाही आणि न्यायालय देखील लक्षात घेत नाही. नैसर्गिक आणि ऐतिहासिकपणाने मराठवाड्यातील मराठे कुणबी आहे. त्यामुळे मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. मी भावनेपोटी बोलत नसून, हे माझे निरीक्षण असल्याचे ठाले पाटील म्हणाले.
मराठा समाजासाठी राजीनामा देण्याची तयारी...
दरम्यान, याचवेळी बोलतांना आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. "मागचा तीन महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं सुरू आहे. आपल्या मुलांच्या दृष्टीने हा पोट तिडकीचा प्रश्न आहे आणि हा सुटला पाहिजे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं पाहिजे. दोनदा प्रयत्न झाला आरक्षणाचा, एकदा राणे समिती आणि दूसर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात. परंतु ते टिकलं नाही. आज महाराष्ट्रात एव्हढा मोठा मराठा समाजाचं जणसमुदाय गोळा केला त्यासाठी जरांगे पाटील यांना धन्यवाद दिलं पाहिजे. ज्यांच्या नोंदी आहे त्यांना कुणबी म्हणुन आरक्षण दिलं पाहिजे. 75 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर नोंदी शोधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आले, ते केवळ आंदोलनामुळे. त्यामुळे, सरकारला कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्र्न सोडवता आला पाहिजे. आम्ही सर्वजण मराठा समाजासाठी राजीनामा द्यायची जरी वेळ आली तरी राजीनामा देऊ, असेही प्रकाश सोळंके म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, हे आहे कारण?