Samruddhi Mahamarg Scam : संदीपान भुमरेंचा समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा घोटाळा, ड्रायव्हरच्या नावे हिबानामा; अंबादास दानवेंच्या आरोपानंतर खळबळ
Ambadas Danve Allegation On Sandipan Bhumre : जटवाडा जमीन प्रकरणात 1150 कोटींचा घोटाळा झाला असून त्याची CID चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी केलेल्या या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ड्रायव्हरच्या नावावर हिबानामा? (Land Gift Deed Controversy)
अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (बक्षीस पत्र) करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा हिबानामा 1971 साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा दानवे यांनी केला. त्यामुळे 1971 मध्ये त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समृद्धी महामार्गासाठी संपादन (Samruddhi Mahamarg Land Acquisition)
जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केल्याचे सांगितले जाते. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याचे आदेश झाल्यानंतर तिचे संपादन मूल्य तब्बल 1150 कोटी रुपये निश्चित करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करत पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीांना पत्र, सीआयडी चौकशीची मागणी (CID Inquiry Demand)
या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. चौकशी झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
आपला सबंध नाही, भुमरेंचा दावा (Sandipan Bhumre On Land Scam)
दरम्यान, या आरोपांबाबत खासदार संदीपान भुमरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आपल्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. तसा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसुल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोप करण्यात आलेला जावेद हा दुसराच असेल. अंबादास दानवेंना सगळीकडे संदीपान भुमरेच दिसतात. अंबादास दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावं."
ही बातमी वाचा :

























