औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उद्या औरंगाबादचा दौरा करणार आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथे आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहे. सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे हे लोहगावात पोहोचणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे स्थानिक नेते मनोज पेरे यांनी दिली आहे.


मराठवाड्यात यंदा दुष्काळ सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात 21 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड आहे. त्यामुळे या भागात आदित्य ठाकरे पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. याचाच एक भाग म्हणून औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथे उद्या आदित्य ठाकरे पाहणी दौरा करणार आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. सोबतच पावसाची परिस्थिती, पिकांची स्थिती याची देखील माहिती जाणून घेणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील असण्याची शक्यता आहे. सोबतच स्थानिक शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहे.


पुन्हा पालकमंत्री भुमरेंचाच तालुका? 


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पैठण तालुक्याचे आमदार तथा औरंगाबाद जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अनेकदा भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात दौरे केले आहे. आदित्य ठाकरे यांचा हा भुमरे यांच्या मतदार संघातील चौथा दौरा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर देखील आदित्य ठाकरेंनी पैठणच्या बालानगरमध्ये शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. आता पुन्हा ते भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील लोहगावत पाहणी दौरा करणार आहे.


शिंदे गटावर टीका करणार?


आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आतापर्यंत पैठण तालुक्यात तीन दौरे केले असून, हा त्यांचा चौथा दौरा आहे. आपल्या मागील तीनही दौऱ्यात त्यांनी शिंदे गटासह भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. सोबतच खोके सरकार म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून टीका केली होती. त्यामुळे उद्याच्या दौऱ्यात देखील आदित्य ठाकरे पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.


मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी पाहणी दौरा?


16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठवाड्यातील सध्याच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर या मंत्रिमंडळात महत्त्वाची चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. सोबतच शेतकऱ्यांना या मंत्रिमंडळ बैठकीतून दिलासा मिळतो का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच आदित्य ठाकरेंचा दौरा होत असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून ठाकरे गट पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


काय सांगता! सर्जा राजांना धुण्यासाठी विकत पाणी, बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट