Abdul Sattar: सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेकडून उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणात, जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत, अशा मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याची भाषा वापरून गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

खासगी फौजदारी तक्रार दाखल केली

या कथित धमकीपूर्ण भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली सी-विजिल (C-Vigil) ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी श्री लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवून अपील दाखल केले होते. सुमारे एक वर्ष तक्रारीचा पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय घेण्यात आला नसल्याने, अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली

या प्रकरणी सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तार, तत्कालीन आचारसंहिता पथक प्रमुख दादराव श्रीपत अहिरे, सिल्लोड निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री  लतीफ पठाण तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या