Chandrapur Municipal Corporation: चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेना उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या सोबत असलेले दोन अपक्ष नगरसेवक आज (26 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आज दुपारी ही भेट होण्याची शक्यता असून या बैठकीत भाजप आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत सर्व 10 नगरसेवक असतील की यातील काही निवडक लोकांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील याबाबत अजून संदिग्धता आहे. दुसरीकडे, काल या 10 नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने आम्हाला जो महापौर पद देईल त्यांच्यासोबत जाऊ या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

महापौर पद कोणाच्या वाट्याला जाणार?

दरम्यान, महापौर पद कोणाच्या वाट्याला जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, सर्वच पक्षांकडून नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे 23 आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 6 नगरसेवक असून वंचित बहुजन आघाडीचे 2, अपक्ष 2 आणि इतर 6 सदस्य अशी परिस्थिती आहे. याशिवाय ठाकरेंच्या गटाकडे दोन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 11 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाकरे गट, वंचित आणि अपक्ष नगरसेवक हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत.

ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची

जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, चंद्रपूरमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत. महापौर पद कसे मिळवता येईल याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. ते पुढे म्हणाले की, काँग्रेससोबतही चर्चा सुरू आहे आणि भाजपसोबतही संवाद सुरू आहे. “जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्यांच्यासोबत जाण्याचा आमचा कल राहील,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

Continues below advertisement

संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांचे संकेत

चंद्रपूरचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनीही परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “ही निवडणूक शिवसेना आणि वंचित यांच्या युतीत लढवली गेली. आमचे 8 नगरसेवक निवडून आले असून 2 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र अजून आमचा अधिकृत गट स्थापन झालेला नाही.” काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी उपरोधिक टोला लगावला. “खायला दिलं आहे पण खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे,” असे ते म्हणाले. महापौर पदाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “अडीच वर्ष महापौर आमचा असेल. ते शक्य नसेल तर अडीच वर्ष उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पद आमच्याकडे असले पाहिजे.  

इतर महत्वाच्या बातम्या