Chandrapur : निलफडी जंगलात मृत वाघाचे अवयव हस्तगत, 19 वाघांची शिकार करणाऱ्या अजित राजगोंडवरचा संशय वाढला
Tiger Poacher Arrested : मध्यप्रदेशातील तस्कर अजित राजगोंड हा चंद्रपुरात किती दिवसांपासून आहे, त्याच्या टोळीने किती वाघांची शिकार केली याचा तपास आता वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोची एसआयटी करत आहे.

चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला झालेल्या अटक प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राजुरा तालुक्यातील निलफडी जंगल परिसरातून वनविभागाने वाघाचे अवयव हस्तगत केले आहे. अजित राजगोंड याने या भागात शिकार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हस्तगत करण्यात आलेले सर्व अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
दुसरीकडे मेघालय राज्याची राजधानी शिलाँग येथून अटक करण्यात आलेल्या माजी सैनिक लालनेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या आर्थिक व्यवहारामुळे लालनेईसंग याला पाठवण्यात आलेल्या वाघांची संख्या ही किमान 9 ते 10 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लालनेईसंग याने चीन सोबतच थायलंडमध्ये देखील वाघांचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे.
वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोकडून SIT स्थापन
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि वाघ असलेल्या क्षेत्रांना रेड अलर्ट जारी केला आहे. सोबतच वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने चंद्रपूरच्या या प्रकरणात एक एसआयटीदेखील स्थापन केली आहे. या एसआयटीकडून अजित राजगोंड अटक प्रकरणात पुढील तपास करण्यात येणार आहे.
अजित राजगोंडाकडून 19 वाघांची शिकार
मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ, केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार असल्याचे ही पुढे आले आहे.
वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अजित राजगोंडला शिक्षा ही दिली होती. मात्र अलिकडेच सप्टेंबर 2024 मध्ये अजित हा जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. मात्र अजित राजगोंडासारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत मोठी वाढ झाली.
अजित राजगोंड या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे? त्याने या भागात वाघांच्या शिकार केली का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोक या भागात आहेत? यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
ही बातमी वाचा:























