Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आठ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर पुन्हा एका घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता चंद्रपुरात वाढलेली वाघाची संख्या खरंच वरदान आहे की शाप असा प्रश्न उपस्थित केला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात 8 दिवसात 8 जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेलाय, यावर काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे अधिवासाच्या समस्येवर वनमंत्री व पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचं प्रेत वनविभागाच्या कार्यालयात नेऊन ठाण मांडू असा इशाराच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दिला आहे. (Vijay Wadettiwar)
वाघांची वाढलेली संख्या शाप की वरदान...
चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघांची संख्या हे जिल्ह्यासाठी वरदान आहे की शाप असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. या मुद्द्यावर पालकमंत्री आणि वनमंत्री यांना तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.मागील पालकमंत्र्यांनी (मुनगंटीवार) मदतीची रक्कम वाढवण्याचे जाहीर केले होते पण फक्त पैसे देऊन सर्व समस्या सुटणार का? मेलेल्या माणसांचा जीव परत येणार का असं असेल तर मग वनविभागाच्या माणसांचा जीव द्या आणि त्यांना पैसे द्या अशी मागणीही त्यांनी केलीय.
आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र भीती व दहशतीचे वातावरण आहे. सध्या तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असल्यामुळे जंगलपरिसरात तेंदुपत्ता तोडणीसाठी नागरिक जात आहेत. सामान्यांसाठी तेंदूपत्ता तोडणीच्या वेळा निश्चित केलेल्या असताना नागरिक अधिक तेंदूपत्ता मिळावा यासाठी संध्याकाळी, रात्री..वनविभागाने दिलेल्या वेळा डावलूनही जंगलात जात असल्याने वाघांच्या हल्ल्यात हाकनाक जीव गमावत असल्याचं दिसून येत आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या जंगलांमध्ये नागरिकांनी दिलेल्या वेळेनंतर जाऊ नये यासाठी काहीतरी तरतूद करण्याची गरज असून नागरिकांवर होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा: