नागपूरः श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवतीर्थ महाल येथे रविवारी तिथीनूसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत महाराजांना मानवंदना दिली. याशिवाय नागपुरातील आखाड्यांनी चित्तथरारक शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली.


सोहळ्याच्या निमित्ताने पावनखिंडीचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी मातीच्या पन्हाळगड, विशाळगड किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाला श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे 11 वे वंशज संदेश देशपांडे, निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक दत्ता शिर्के यांच्यासह हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती.


...म्हणून तिथीनुसार आज आयोजन


मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या 2500 वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक. या शिवराज्याभिषेकानंतरच स्वराज्याला एक ता‌त्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे, हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. भविष्यात पाकिस्तानातील 'अटक' शहराच्या पुढेही मराठ्यांचा वारू चौखुर उधळला, याची यशस्वीपणे पायाभरणी करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. त्यामुळे तिथीनुसार शिवराज्याभिषेक यावेळी 12 जून रोजी साजरा करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या


संत गजानन महाराज पालखी आज श्री क्षेत्र डव्हा मुक्कामी; तर मुक्ताईच्या पालखीचा आज खंडाळा मकरध्वज येथे मुक्काम


ममतादीदींना कितीही प्रयत्न करू दे, राष्ट्रपती पदाची निवडणूक भाजपाच जिंकणार,  कपिल पाटील यांचा विश्वास


संजय राऊत यांनी बोलणे बंद केले नाही तर, शिवसेना संपेल; खासदार डॉ अनिल बोंडे यांचा खोचक टोला


मनपातर्फे मालमत्ता धारकांना 1 कोटी 22 लाखांची कर सवलत