मुंबई : राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.  आता नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Continues below advertisement

या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार असल्याची माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

योजनेअंतर्गत पशुपालकांना विमा हप्त्यावर 85 टक्के अनुदान मिळणार

राज्यातील पशुपालकांना नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, अपघात किंवा इतर कारणांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत 'पशुधन विमा योजना' राज्यभर राबविण्यास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत पशुपालकांना विमा हप्त्यावर 85 टक्के अनुदान मिळणार असून लाभार्थ्याला केवळ 15 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. उर्वरित खर्च केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या प्रमाणात उचलणार आहे. 

Continues below advertisement

कोणत्या व किती जनावरांनी विमा मिळणार? 

कोणत्या जनावरांचा विमा होणार असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. तर देशी व संकरित दुधाळ गायी त्याचबरोबर म्हशी, बैल व रेडे, शेळ्या, मेंढ्या या जनावरांचा विमा मिळणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला कमाल 10 पशुधनासाठी अनुदानित विमा मिळणार आहे. तर १० पेक्षा जास्त जनावरे असल्यास अतिरिक्त जनावरांचा संपूर्ण विमा हप्ता पशुपालकाला स्वतः भरावा लागणार आहे.

कोणत्या जनावरांना किती मिळणार मदत?

दुधाळ गाय - 70000दुधाळ म्हैस - 80000बैल - 70000रेडा - 80000शेळी/मेंढी - 7000

विमा कालावधी व प्रीमियम पशुपालकांना 1,2 किंवा 3 वर्षांसाठी विमा घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. 1 वर्ष - 4.30 टक्के, 2 वर्षे - 7.50 टक्के◼ तर  3 वर्षे - 10.50 टक्के ही दररचना निविदा प्रक्रियेत निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार? 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुधनाची 12 अंकी इअर टॅगद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन प्रणाली (NDLM) मध्ये नोंद असणे आवश्यक आहे. शासकीय किंवा नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे. 

कोणत्या परिस्थितीत मिळणार विमा दावा रक्कम? 

विमा कालावधीत अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोग, वीज पडणे, पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट, भूकंप अशा कारणांमुळे जनावराचा मृत्यू झाल्यास विमा दावा मंजूर केला जाणार आहे. मात्र शासनाने निर्धारित केलेले लसीकरण पूर्ण असणे आवश्यक राहील. 

दावा करण्यासाठी महत्त्वाची सूचना 

1) जनावराचा मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत विमा कंपनीला मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळ, ई-मेल किंवा फोनद्वारे माहिती देणे आवश्यक आहे. 2) सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत विमा रक्कम थेट लाभार्थ्याच्या 3) आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा करणे विमा कंपनीस बंधनकारक असेल. विलंब झाल्यास लाभार्थ्याला 12 टक्के वार्षिक व्याज द्यावे लागेल. 

कोण करणार अंमलबजावणी? 

या योजनेची राज्यस्तरीय अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर मार्फत करण्यात येणार असून, विमा कंपनी म्हणून Agriculture Insurance Company of India (AIC) ची निवड करण्यात आली आहे.