बुलढाणा: बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ टाकत सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी रक्षणासाठी आहेत की आमदारांची गाडी धूण्यासाठी आहेत असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना केला. त्यानंतर विरोधकांनी आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना धारेवर धरलं. त्यानंतर आता आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 


आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?


माझ्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाने बाहेर हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला व प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली. त्यामुळे गाडी संपूर्ण भरली होती व घाण झाली होती, तर गाडी धुण्यावरून ड्रायव्हर व त्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला व ड्रायव्हरने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटलं की, तू उलटी करून गाडी खराब केली तूच गाडी धुवून दे. म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली, यात काहीही गैर नाही. आम्ही त्याला गाडी साफ करण्याचं सांगितलं नाही, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. 


या प्रकरणावर पोलिसांची प्रतिक्रिया 


काल मला शेगाव येथे कोर्टाची तारीख होती. त्यामुळे मी आज उशिरा ड्युटीवर आलो व थोडं अस्वस्थ व्हायला लागलं व मला चालू गाडीत उलटी झाली. त्यामुळे, ती गाडी खराब झाली होती, मला कोणीही गाडी साफ करण्याचा किंवा धुण्याचा सांगितलं नव्हतं, असे पोलीस कर्मचारी युवराज मुळे यांनी म्हटलं आहे.


नक्की प्रकरण काय?


बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या कार्यालयासमोर सकाळी चक्क एक पोलीस कर्मचारी त्यांची कार धुताना कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर टाकत सरकारवर आरोप केले आहेत. खरंतर पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की गाड्या धुण्यासाठी....? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आ. संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर पोलीस कर्मचारी आमदारांची गाडी धुतानाचा व्हिडिओ बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक वरून शेअर केला आहे. व या सर्व प्रकारावर त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर आरोप केला आहे.


काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?


बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांच्या घरासमोर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबूकवर टाकत पोलीस यंत्रणेची चाटूगिरी असं लिहीत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिलंय,


कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!


महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! 😡
सद्रक्षणाय , खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी ?
दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते ! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का ? 
एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का?
आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले = पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . !
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. 
पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. 
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😡