बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात मुली व विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचा सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. काल(बुधवारी, ता ११) "एबीपी माझा" ने गेल्या 24 तासात जिल्ह्यातून सहा महिला बेपत्ता झाल्याची (Buldhana Crime News) बातमी दिली होती, त्यानंतर पोलीस विभागाकडून थातूरमातूर प्रेस नोट काढत. गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या महिलांपैकी 87% महिला पोलिसांनी शोधून काढल्याचा दावा केला व स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र या प्रेस नोटमध्ये कुठलीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षी जवळपास जिल्ह्यातून दीड हजारच्या वर व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यात सुमारे 1000 च्या वरती महिला होत्या.(Buldhana Crime News)
मात्र पोलीस विभागाकडून काढण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये याचा कुठलाही खुलासा केलेला नाही व प्रेस नोट वर कुठल्याही प्राधिकृत अधिकाऱ्याची सही नाही बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेल्या 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली व एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मात्र यावर पोलीस प्रशासनाकडून कुठली ही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. यावर मात्र पोलीस,सामाजिक संस्था किंवा महिला आयोग काहीही बोलण्यास तयार नाही.(Buldhana Crime News)
24 तासात जिल्ह्यातून एक विवाहितेसह सहा मुली बेपत्ता
बुलढाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींसह महिला व सज्ञान मुली बेपत्ता होण्याचा प्रमाण लक्षणीय वाढलं असून गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सहा मुलींसह एक विवाहिता बेपत्ता झाली आहे. तर १ जानेवारी ते 10 मार्च पर्यंत जिल्ह्यातील 289 जण बेपत्ता झाले आहेत त्यात 200 च्या वर महिला आहेत. बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचं प्रमाण वाढलं असल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेच व दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचे किंवा महिलांचे नंतर काय होतं याबाबत कुठलीही माहिती समोर येत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. याबाबत मात्र पोलीस बोलण्यास तयार नाहीत.(Buldhana Crime News)
पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये काय म्हटलंय?
जिल्हा पोलीस दलाने वर्ष 2025 मध्ये हरविलेल्या पैकी 87% महिलाचा घेतला यशस्वी शोध.बुलढाणा जिल्ह्यामध्ये विवीध कारणांनी महिला हरविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशा हरविलेल्या महिलांचा यशस्वी शोध घेण्याचे काम जिल्हा पोलीस दल करीत आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा येथे "महिला मिसिंग डेस्क", तर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर "मिसिंग सेल" कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. सदर महिला मिसींग डेस्क व मिसींग सेल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर सुव्यवस्थित समन्वय ठेवून वर्ष-2025 मध्ये अभिलेखावर नोंद असलेल्या एकूण महिला मिसींग प्रकरणा पैकी "87%" महिलांचा यशस्वी शोध घेतला आहे. तर सध्यस्थितीत सन 2021 पासून आज पर्यन्त महिला हरविण्याच्या (मिसींग) प्रलंबीत प्रकरणांची संख्या 284 असून त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
