आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
जिल्ह्यात आणि माध्यमांमध्ये ज्या गाडीची चर्चा होत आहे. ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे, तो माझा नातेवाईकही आहे

बुलढाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे कायम लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad) नव्या वादात सापडले आहेत. कारण, बुलढाणा (Buldhana) भाजपा जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दीड कोटी रुपयांची नवी कोरी डिफेन्डर कार कोणत्या कामातील कमिशन आहे? असा सवाल केला आहे. आता, आमदार गायकवाड यांनी या डिफेन्डर कारबाबत (Car) सर्व ती माहिती दिली आहे.
जिल्ह्यात आणि माध्यमांमध्ये ज्या गाडीची चर्चा होत आहे. ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे, तो माझा नातेवाईकही आहे आणि पक्षाचा कार्यकर्तादेखील आहे. निलेशने 100 टक्के कर्ज काढून ती गाडी घेतलेली आहे, आणि मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे. माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावला आहे, त्यात काही गैर नाही, असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले. तसेच, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार देखील केला. ज्यांनी माझ्यावर कमिशन म्हणून आरोप केले, त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही, असे आमदार गायकवाड यांनी म्हटले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच बुलढाण्यात महायुतीत भडका उडाला आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपल्याचे दिसून ययेते. एकमेकांवर कुरघोडी करताना आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विशेषत: आमदार संजय गायकवाड यांच्याकडील दीड कोटींच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून महायुतीत वाद उफाळून बाहेर आला आहे.
भाजपा जिल्हाध्यक्षाचा गंभीर आरोप
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विजय शिंदे म्हणाले की, जर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार होत असेल तरच युती शक्य आहे. बुलढाण्यात बेडकासारख भाषणातून युती पाहिजे... युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली याची चौकशी व्हावी. मतदारांना वेश्यापेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक नाकारतील म्हणून भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही, असे शिंदे यांनी म्हटले होते.
हेही वाचा
मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा

























