बुलढाणा : अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस (police) आणि वन विभागाच्या (Forest) पथकावर अतिक्रमण धारकांनी जोरदार हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा (Buldhana) जवळअसलेल्या माळेगाव येथे ही घटना घडली. या मारहाणीत काही पोलीस जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या मारहाणीच्या घटनेनं जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
माळेगाव येथील काही कुटुंबांनी वन जमिनीवर अतिक्रमण करुन आपले संसार थाटले होते. येथील अतिक्रमण धारकांना यापूर्वीच वन विभागाने नोटीस देऊन शासकीय वन जमीन रिकामे करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यानंतर आम्ही वन जमीन खाली करू, असं अतिक्रमण धारकांचं म्हणणं होतं. त्यातून शाब्दिक वाद होत अतिक्रमण धारकांनी पोलीस आणि वनविभागाच्या पथकावर हल्ला केला आहे.
पोलीस आणि वन विभागातील पथकाच्या वाहनांवर अतिक्रमण धारकांनी दगडफेक केली असून अतिक्रमण धारकांच्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, जखमी पोलिसांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
