बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती होत असलेल्या गावात आयसीएमआरच्या प्रतिनिधींचं पथक आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे पुन्हा नमुने घेतले जात आहे. यामुळे मात्र या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. 

एक महिन्यापूर्वी आयसीएमआरच्या पथकाने ज्या नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले होते त्याच नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुन्हा घेण्यात येत असल्याने या परिसरात संभ्रम निर्माण होत आहे. यावर बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते म्हणाले की, ज्या लोकांच्या रक्ताचे नमुने एक महिन्यापूर्वी घेतले होते त्याच नागरिकांचे पुन्हा रक्ताचे नमुने तपासण्यात येत आहे. त्यात काही सुधारणा झाली का हे तपासून बघणार आहोत. हे नमुने आयसीएमआरच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली घेण्यात येत आहे.

रेशनच्या गव्हामध्ये सेलेनिअम

बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास 15 गावांत महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक दिवसांपासून याचं कारण समोर येत नव्हतं. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तातील आणि केसात सेलेनियम या जड धातूचं प्रमाण हे याचं प्रमुख कारण असल्याचं कळतंय. हे सेलेनियम इथले नागरिक जो गहू वापरतात त्यातून त्यांच्या शरीरात गेल्याचा अंदाज लावला जातोय. 

या सेलेनियममुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने केंद्राच्या एका विशेष पथकाने खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणी केली. दरम्यान गव्हासह तांदूळामध्ये धान्य टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल जास्त प्रमाणात आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर गोदामातील धान्याची उचल न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेलेनियम म्हणजे नेमकं काय?

  • सेलेनियम हा एक जड धातू आहे.
  • मानवी शरीराला जेवणातून किंवा पाण्यातून सेलेनियम मिळतं.
  • शरीरात जर सेलेनियम कमी प्रमाणात असेल तर केसांची वाढ झपाट्याने होते.
  • पण सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यास केसगळती होते.
  • पालक, मांसाहारी पदार्थ, मास, गहू अशा पदार्थात सेलेनियम जास्त असतं.

ही बातमी वाचा: