Buldhana : बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी होत आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्वेता महाले यांनी पत्र देऊन नामकरण करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Continues below advertisement

राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

आता बुलढाण्याचे नाव बदलण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा असे श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, या आधी उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर औरंगबादचे छत्रपती संभाजीनगरस असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळं आता बुलढाणा जिल्ह्याचं देखील नामकरण करण्याची ंमागणी जोर धरत आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेत प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 

सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी

राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. त्यात नमूद करण्यात आले की, मातृतीर्थ सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी आहे, ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात राजमाता जिजाऊसाहेबांचे योगदान अतुलनीय आहे.

Continues below advertisement

बुलढाणा हा महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक जिल्हा आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 9 हजार 640 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्यामध्ये 13 तालुके समाविष्ट आहेत. ही भूमी ऐतिहासिक वारसा, संतभूमी आणि भौगोलिक विविधतेने नटलेली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण व पश्चिम भागात अजिंठा डोंगररांगांचे विस्तार आहेत, तर उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा काही भाग पसरलेला आहे. येथील भूमीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे उल्कापातामुळे बेसाल्ट खडकात तयार झालेले जगातील एकमेव खारे पाणी असलेले लोणार सरोवर आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळाला भेट देण्यासाठी येतात.