बुलढाणा: बुलढाण्यातील खामगाव येथील व्यापाऱ्याचा विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील ही घटना आहे. दोन दिवसांपूर्वी हे व्यापारी हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती, त्यानंतर आता व्यापाऱ्याचा अशा स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, ज्या स्थितीत मृतदेह आढळून आला त्यामुळे ही घातपाताची शक्यता दिसून येत असल्याने पोलिस तपास सुरू झाला आहे.
पोलिसांना घातपाताची शंका बळावली
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विहिरीत हातपाय बाधलेला 48 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेचा तपासा सुरू केला आहे. विहिरीतील मृतदेह हा खामगाव येथील व्यापारी असलेले घनश्याम भुतडा यांचा असल्याचे समोर आलं असून मृतदेह हातपाय बांधलेला अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांना घातपाताची शंका बळावली असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे, तर मृतकाचे नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भुतडांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. यावरून त्यांची हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला.
बेपत्ताची तक्रारघनश्याम भुतडा यांच्या मुलाची शेगावातील एका कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता निवड झाली आहे . प्रवेशाच्या चौकशीसाठी सुटाळा येथील एका शिक्षकाकडे जाऊन येतो म्हणून ते 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजतापासून घराबाहेर पडले होते. तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. त्यांचा शोध घेत असतानाच मलकापूर तालुक्यात मृतदेह आढळला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.