बुलढाणा : अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खासगी बसला वाराणसी-गोरखपूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील 44 भाविकांना घेऊन काही दिवसांपूर्वी ही बस धार्मिक पर्यटनावर निघाली होती. अयोध्या (Ayodhya) व वाराणसी धाम व तेथून आज नेपाळकडे देवदर्शनासाठी जात असताना बोलेरो गाडीला वाचविताना या खासगी बसला वाराणसीजवळ भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे रोडच्या रेलिंगला ही बस धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातात जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील सरस्वती पाखरे तर अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई अशा 02 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून पर्यटन दौऱ्यावर असलेल्या आप्तेंष्टांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.
अपघाताच्या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, रुग्णालयाता जाऊन जखमींची विचारपूस देखील केली. एसएसपी राकेश मिश्रा यांनी घटनेची माहिती देताना अपघातातील मृतांना पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत, त्यांच्यावर योग्य त्या उपचाराच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
इंदूर-पुणे महामार्गावर अपघात
वाहतूक कोंडीमुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर देखील भीषण अपघाताची घटना घडली. इंधनवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मनमाड- मालेगाव चौफुली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तीना इंधन भरुन जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला असून या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा
मुंबई विमानतळावर आगीची घटना, अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी; प्रवाशांमध्ये धांदल
