BMC Mayor 2026: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 जाहीर झाल्यानंतर (Mumbai Municipal corporation election result 2026) आता महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 ची मॅजिक फिगर आहे. मात्र मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नसल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर दरवेळी एक ठरावीक चर्चा हमखास रंगते की “महापौर होण्यासाठी 114 नगरसेवक हवेत”. मात्र ही समजूत अर्धवट माहितीवर आधारित असून वस्तुस्थितीशी विसंगत आहे. कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या पाहता, मुंबई महापौर पदासाठी 114 चा आकडा बंधनकारक नाही, असं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक असतात. त्यातील निम्म्यापेक्षा एक अधिक म्हणजे 114 हा आकडा बहुमतासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र महापौर निवडणूक ही पूर्ण सभागृहाच्या बहुमतावर नव्हे, तर उपस्थित व मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर अवलंबून असते. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार महापौराची निवड ही महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होते. सभेसाठी आवश्यक तेवढा कोरम पूर्ण असणे गरजेचे असते. उपस्थित आणि मतदान करणाऱ्या नगरसेवकांपैकी ज्याला अधिक मते मिळतात, तो महापौर निवडला जातो. याचा स्पष्ट अर्थ असा की 227 पैकी 114 मते मिळायलाच हव्यात, अशी कोणतीही कायदेशीर अट नाही, अशी माहितीही अनिल गलगली यांनी दिली. (Anil Galgali On BMC Mayor)
90, 85 किंवा त्याहून कमी संख्येतूनही महापौर निवड होणे शक्य- (BMC Mayor 2026)
राजकीय वास्तव पाहिले तर अनेकदा विरोधी पक्ष बहिष्कार टाकतात, काही नगरसेवक अनुपस्थित राहतात किंवा रणनीती म्हणून मतदान टाळले जाते. अशा वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांमधील साधे बहुमत महापौर निवडीसाठी पुरेसे ठरते. त्यामुळे 90, 85 किंवा त्याहून कमी संख्येतूनही महापौर निवड होणे शक्य आहे.मग प्रश्न पडतो की 114 या आकड्याचा इतका गाजावाजा का? कारण 114 हा आकडा स्थिर सत्ता चालवण्यासाठी ठराव मंजूर करण्यासाठी, स्थायी समिती व विषय समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. परंतु केवळ महापौर पदासाठी 114 ही अट नाही, ही वस्तुस्थिती जाणूनबुजून किंवा अज्ञानातून दुर्लक्षित केली जाते, असं अनिल गलगली म्हणाले.
मुंबई महापौर पदाची लढाई ही केवळ आकड्यांची नाही- (Mumbai Municipal Corporation Mayor)
सध्याच्या राजकीय परिस्थितीत, जिथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, तिथे युती, बाह्य पाठिंबा आणि राजकीय रणनीती यांच्या जोरावर महापौर निवड शक्य आहे. त्यामुळे “114 शिवाय महापौर होऊ शकत नाही” हा दावा भ्रम निर्माण करणारा ठरतो. मुंबई महापौर पदाची लढाई ही केवळ आकड्यांची नसून कायदा, रणनीती आणि राजकीय चातुर्याची आहे. म्हणूनच ठामपणे सांगता येईल की मुंबई महापौर होण्यासाठी 114 चा जादुई आकडा आवश्यक नाही, असं अनिल गलगली यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 --------------एकूण- 227