नागपूरः अनेक दशकांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यप्रणालीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने ही परिषद तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातील कुस्ती नागरिकांनी बघितली आणि सत्तांतर झाले. आता भारतीय कुस्ती महासंघाच्या हलचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas)आणि अर्जुनवीर पै. काका पवार यांनी आज नागपुरातील जवाहर वसतीगृह येथे अर्ज भरला. राज्यातील 45 जिल्हा तालीम संघांपैकी 33 तालीम संघांचा तडस, पवार गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. या पाठिंब्याच्या जोरावर या निवडणूका बिनविरोध  करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे.


महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारावी. विदर्भातील कुस्तीपटूंनाही चांगले प्रशिक्षण देऊन त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करावे असे आमचे स्वप्न असून यासाठी केंद्र सरकारकडून विविध सोयीसुविधा, प्रशिक्षण आणि कुस्तीगिरांना मानधन प्राप्त करुन देणे अशा अनेक सुविधा आम्ही मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी रामदास तडस यांनी दिली.


यावेळी पै. काका पवार यांनी अध्यक्षआणि सचिव या दोन्ही पदांसाठी अर्ज भरला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी रामदास तडस-वर्धा, धवलसिंग मोहीते-सोलापूर, काका पवार-लातूर यांनी नामांकन भरला आहे. तसेच वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी विजय पराते-पुणे, धवलसिंग मोहीते-सोलापूर, गावंडे-पिंपरी चिंचवड हे चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सचिव पदासाठी  काका पवार-लातूर, संदीप भोंगळे-पुणे, योगेश दोडके-पुणे यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. अर्जांची छाननी उद्या शनिवारी होणार आहे. तसेच 31 जुलै रोजी मतदान होईल. एकूण 90 मतदारांपैकी 80 टक्के समर्थन आम्हाला असल्याचा दावा यावेळी खासदार रामदास तडस यांनी केला आहे.


अंतर्गत राजकारणावर पवार


या परिषदांमध्ये राजकारण होत असल्याची मागे चर्चा होती. त्यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की, 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे आयोजन करणे हे माझे काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेवर गेलो होते. क्रीडा संघटनांना मैदान मिळणे कठीण असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे काम आहे. मी कधीही अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. राहुल आवारे, अभिजीत कटके,  उत्कर्ष काळे, किरण भगत यांना मी मदत केली. अनेक खेळाडूंना वैद्यकिय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितले आहे. कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही.'