Bird Flu In Uran: रायगडच्या उरणमधील चिरनेर गावात कुक्कुट पालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत्यू पावत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्यांचे नमुने भोपळा आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं. त्यानंतर या परीसरात एकच खळबळ उडाली.
बर्ड फ्लू या रोगामुळे चिरनेर परिसरातील 10 किलोमिटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, या गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकाऱ्यानी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या आहेत. त्यामुळे कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्याने पोल्ट्री व्यवसायिक चिंतेत आहेत.
केंद्र सरकारच्या माध्यमांतून जवळपास 10 टीम या परीसरात तैनात-
केंद्र सरकारच्या माध्यमांतून जवळपास 10 टीम या परीसरात तैनात करण्यात आल्या होत्या. संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या असून अजूनही दोन टीम या परीसरात कार्यरत आहेत. पुढील तीन महिने संपूर्ण परिसरावर देखरेख करणारी टीम कार्यरत राहणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पोल्ट्री व्यवसाय चिंतेत असून आमच्या नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई योग्य आणि तात्काळ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
नागपूरात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू-
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी येथे एका शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोरांच्या या मृत्यूने खळबळ उडाली आहे. एच१एन१ या विषाणूमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भात शासनाकडून ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. अशातच पाच मोरांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी काही तरुणांना शेतात मोर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी आले. वन विभागाच्या चमूने घटनास्थळी पोहोचून त्याठिकाणीच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करत अंत्यसंस्कार केले. या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळे ही होऊ शकतो अशी शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. मृत पक्षांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील न्यायवैद्याक प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील संस्थेला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.