नाशिक: राज्यभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता खरातकडे (Ashok Kharat) असलेल्या बंदुकीचा परवाना खुद्द नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले असून, त्याच्या फार्महाऊसवरून मोठ्या प्रमाणावर काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यामुळे खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे.  शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Ashok Kharat)

२०१२ मध्ये मिळाला होता परवाना

तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, अशोक खरातने शस्त्र परवान्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर १५ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याला हा परवाना देण्यात आला होता. विशेष म्हणजे, या परवान्याचे नुकतेच १ जानेवारी २०२४ रोजी नूतनीकरण (Renewal) करण्यात आल्याची नोंदही प्रशासकीय दप्तरी आढळली आहे.

२१ काडतुसे जप्त; ५ काडतुसांचा वापर?

पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात एकूण २१ काडतुसे जप्त केली आहेत. तपासणीदरम्यान यातील ५ काडतुसे वापरलेली असल्याचे आढळून आले आहे. ही पाच काडतुसे नेमकी कोणावर किंवा कशासाठी चालवण्यात आली? याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत. खरातने या शस्त्राचा वापर कोणाला धमकवण्यासाठी किंवा शिकारीसाठी केला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

एकीकडे खरातच्या अघोरी कृत्यांची मालिका समोर येत असताना, त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला आणि त्याचे नूतनीकरण कोणाच्या शिफारसीवरून झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता खरातचे गुन्हेगारी स्वरूप स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.

भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक अकाऊंट सील 

भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे, त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे, पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार आहे.