Nana Patole on Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची (Drought) परिस्थिती असताना राज्य सरकारकडून उशिरा दुष्काळ जाहीर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी केला आहे. कर्नाटक सरकारने एक महिना आधीच दुष्काळ जाहीर करुन मदत सुरू केली. मात्र, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार यावर उशिरा निर्णय घेत आहे. सरकारच्या या उशिराच्या भूमिकेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका देखील पटोलेंनी केली आहे.
केवळ 75 टक्के नव्हे तर 99 टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करायला उशीर केल्याचे पटोले यावेळी म्हणाले. केवळ 75 टक्के नव्हे तर 99 टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती असून तातडीनं पंचनामे करून सरसकट कर्जमाफी व भरभक्कम मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी करताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगाल भाजपच्या प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्याची केलेली मागणी म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे, असा निशाणा पटोले यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या दोन सहकारी सदस्यांवर आमचा स्पष्ट आक्षेप आहे. या सदस्यांनी 10 दिवसांत अनेकदा केंद्रीय सचिवांना व मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्रे लिहून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकीतील गैरव्यवहारांबाबत आणि लोकशाहीचा खून होत असल्याबद्दल लक्ष वेधले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे.
आमचा आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्तांवर
आमचा आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्तांवर आहे, भारतीय जनता पक्षावर नाही. परंतु, भाजप जर ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनात इतक्या ताकदीने पुढे येत असेल, तर याचा अर्थ महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कृपेनेच विजय मिळवला गेला आहे का?" असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. सरकारला आता जनतेची भीती राहिली नाही असेही ते म्हणाले.
देशात लोकशाहीचा मोठा उद्रेक सुरू
देशात लोकशाहीचा मोठा उद्रेक सुरू असून मतदारांच्या अधिकारावरच घाला घालण्याचे काम या पद्धतीने सुरू आहे. पूर्वी सरकार लोकांना घाबरायचे, पण आता उलटी परिस्थिती निर्माण झाली असून लोकच सरकारला घाबरत आहेत असे पटोले म्हणाले. याचा परिणाम शेतकरी, कामगार, बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था यांसारख्या सर्वच क्षेत्रांवर होत असून जनतेच्या मनातली भीती आता भाजप सरकारमध्ये राहिलेली नाही, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.