भंडारा : पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी (Parth Pawar Land Deal) चौकशी समितीचा फार्स करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी असं आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलं. तसेच महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामध्ये शरद पवारांची मोठी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे (Vikas Kharage) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली.
Tukaram Mundhe Committee : तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात तपास करा
नाना पटोले म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचं काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि 'दूध का दूध पाणी का पाणी' करायचं असेल तर, तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा."
Nana Patole On Land Scam : राज्यात अनेक जमीन घोटाळे
राज्यात जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, "पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचं आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचं धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचं मार्केट यार्ड होतं, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावानं देण्यात आली. असं सगळं सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे."
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरुन स्पष्ट होतं. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात. अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला.
ही बातमी वाचा: