Bhandara Crime News : चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी असलेल्या एकाचा आज(15 एप्रिल) सकाळी उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पहेला गावात शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास सध्या करत आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मुबारक सय्यद (वय 22 वर्ष ) असं मृतकाचं नावं आहे. तर, जखमींमध्ये पृथ्वीराज खंगार (वय 35 वर्ष ) धनराम टेकाम(वय 40 वर्ष ) आणि रज्जू सय्यद (वय 55 वर्ष ) या तिघांचा समावेश आहे. शनिवारी मध्यरात्री गावातील 20 ते 25 जणांनी मृतक मोहम्मद याचं घरं गाठून त्याच्यासह पृथ्वीराज आणि धमराम यांना चोर असल्याच्या संशयावरून विचारपूस करीत जबर मारहाण केली. यावेळी मोहम्मद याची आई रज्जु ही त्यांना सोडविण्यासाठी आली असता त्यांनीही ग्रामस्थांनी मारहाण केली. यात उपचारा दरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला. तर गंभीर तिघांपैकी रज्जू यांच्यावर नागपूर तर अन्य दोघांवर भंडाऱ्यात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

पाण्यासाठी ग्रामपंचमध्येच फाशी घेण्याचा प्रयत्न, उपसरपंचा ठेवले डांबून

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील चुरमुरा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये शेकडो ग्रामस्थासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सटवा बन्सी राठोड असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्यांना निवेदने देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. गावातील जलजीवन मिशनचे दोन वर्षापासून अद्यापपर्यंत पाणी मिळालेले नाही. चुरमुरा हे गाव अतिशय जंगलामध्ये असलेले गाव असून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपसरपंच याना एका खोलीत डांबून ठवले असून ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे मागणी  केली आहे.

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकास आरसीपी पथकाने केली अटक

यवतमाळच्या पुसद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सुरू असताना देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका युवकास पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आरसीपी पथकाने अटक केली.  पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांना गोपनीय माहिती मिळाली की शेख सलीम शेख इस्माईल राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद हा युवक देशी कट्टा घेऊन शहरातील न्यायालय परिसरामध्ये फिरत आहे. त्यावरून आरसीपी पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या युवकाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून एक गावठी कट्टा व दोन काडतूस आढळून आले. त्याला ताब्यात घेत शस्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पुढील तपास पोलिस करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या