Bhandara Accident News : लग्न समारंभासाठी नागपूर इथून रायपूरकडं दुचाकीनं निघालेल्या दाम्पत्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकनं जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगा रस्त्यावर कोसळून (Accident News) जखमी झालेत. गंभीर जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, पतीसह दोन वर्षीय मुलावर उपचार करण्यात येत आहे. ही घटना आज (21 एप्रिल) सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 53 वरील जुना कारधा टोल नाक्याजवळ घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून ट्रॅक चालकाविरूद्ध गुन्हा (Crime) दाखल करून त्याला अटक केली आहे.
डोळ्यादेखत चिमुकल्याच्या आई मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, संतोषी निषाद (वय 27 वर्ष) रा. साखरकरवाडी, नागपूर असं मृत महिलेचं नावं आहे. अपघातात जखमी झालेले त्यांचे पती श्रावण निषाद (वय 28 वर्ष) आणि मुलगा तेजस यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं. नागपुरात गवंडी काम करणारा श्रावण व त्याची पत्नी संतोषी आणि मुलगा तेजससह दुचाकीनं रायपूरला एका नातेवाईकाच्या घरी असलेल्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले असताना ही घटना घडली. कारधा पोलिसांनी ट्रॅक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र डोळ्यादेखत चिमुकल्याच्या आई आणि पत्नीचा मृत्यू झाल्याने निषाद कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
गडचिरोलीच्या रेगुंठा परिसरातील नागरिकांचा रस्त्याअभावी खडतर प्रवास
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील रेंगुठा परिसरातील नागरिकांना पक्क्या रस्त्याअभावी आजही खडतर प्रवास करावा लागत आहे. सिरोंचा आणि अहेरी या दोन तालुक्यात ये-जा करण्याकरिता बेज्जूरपल्ली-पर्सेवाडा हा एकमेव मार्ग आहे. मात्र या मार्गाचे अद्यापही खडीकरण झाले नसल्यामुळे इंग्रज काळात तयार झालेल्या पायवाटेनेच नागरिकांना ये जा करावी लागत आहे. एकीकडे स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र रस्त्याअभावी नागरिकांना नरकयातना भोगावे लागत असल्याने प्रशासनाप्रति नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
बेज्जूरपल्ली- पर्सेवाडा हा रस्ता पहाडीवरून जात असून या रस्त्यावर मोठमोठे दगड असल्याने केव्हाही अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची अनेकदा मागणी रेटली. मात्र प्रशासनाने डोळेझाक केली असल्याने नागरिकात रोष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
