बीड: बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale)ने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा निकटवर्तीय आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सतीश भोसले यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो नोटांचे बंडलं गाडीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. आता सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल होत असून तो थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सतीश भोसले कोण आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
सतीश भोसले कोण आहे?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली, तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. गेल्या 24 तासात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली आहे. यावरून अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावरून सुरेश धस यांनी हो, सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्टीकरण दिले.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करा
सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा नोंद करा अशी आक्रमक ग्रामस्थांची शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. बीडच्या शिरूर पोलीस ठाण्याबाहेर सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बावी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शिरूर येथील खोक्या नावाच्या गुंडाने बावी गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले तर महेश ढाकणे याचा पाय फ्रॅक्चर झाला. घटना घडल्यानंतर ढाकणे कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. मात्र त्यादरम्यान गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, अखेर आज पोलिसांनीच फिर्यादी होतं. या प्रकरणात सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र बावी गावचे ग्रामस्थ आणि ढाकणे कुटुंबातील सदस्यांनी शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.