बीड : सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाबाबत प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागत असेल तर सरकार म्हणून तु्म्ही काय केलं. आत्तापर्यंत 9 जणांना आतमध्ये टाकलं ते देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केल्यामुळेच या आरोपींना तुरुंगात टाकलंय. पण, सरकार म्हणून तुम्ही काय केलंय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. तसेच, राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकलं असतं, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल नाराजी उघड केली आहे. तुम्हाला किती तिरस्कार आहे, हे यावरून लक्षात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे चालू दिले नाही, तर उपमुख्यमंत्र्यांचे काय चालू देणार आहेत, असे म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नाव न घेता सरकारवर मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव असल्याचे सूचवले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये आजपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. फरार आरोपीच्या अटकेसाठी आणि याप्रकरणात काहींना सहआरोपी करण्याची मागणी करत गावकरी आंदोलनाला बसले आहेत. यावेळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली. यावेळी, राज्य सरकारच्या भूमिकेवर आणि तपासावर नाराजी व्यक्त करत शिंदे सरकार असतं तर सर्वांना आतमध्ये टाकलं असतं असेही त्यांनी म्हटलं. सरकारने या ठिकाणी काळजी दाखवायला पाहिजे होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या ठिकाणी आले नाहीत. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीही अधिकार नाहीत, त्यांना अधिकार दिले तर आरोपी अटक होतील. देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडून प्रयोग सुरू आहेत, नेत्यांनी येऊन इथं कागदपत्रं घ्यायचे हा प्रसिद्धीचा भाग सुरू झाला आहे, असे म्हणत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावरुन मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात प्रगती काय हेच सांगा, उद्याच्या 9 तारखेला चारशीट दाखल होईल. हे सरकार उघडे पडले आहे, एकही आरोपी सुटणार नाही आणि इतर आरोपींना सहआरोपी केले पाहिजे. त्यांनी भूल थापा देऊन अर्ध्यातून पळून जायचे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. तसेच, देशमुख कुटुंबीयांच्या जिवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत आहे, इथे इतर लोकांनी काही केलं तर आम्ही जबाबदार नाही. तुमच्या हातात सत्ता आल्याने लोकशाही मारून टाकली का? उपोषणाबाबत गावकऱ्यांचा निर्णय आहे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी एकप्रकारे सरकारला इशाराच दिला आहे.
जरांगेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना देखील फोन करुन संवाद साधला. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नाहीत, असे म्हणत आंदोलकांच्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. मस्साजोगमधील नागरिक आजपासून अन्नत्याग आंदोलन करत असून 2000 लोकसंख्या असलेल्या मस्साजोग गावातील किमान 200 पेक्षा जास्त लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.