बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोप वाल्मिक कराड याला प्रशासन आणि पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदी असल्यामुळे या गोष्टी घडत आहेत, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आणि प्रशासना मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. वाल्मिक कराड (Walmik Karad) सरेंडर होण्यापासून ते आता रुग्णालायपर्यंत त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. धनंजय मुंडे मंत्रीपदी असल्यामुळे या गोष्टी घडत आहेत. 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघाला होता. त्यावेळीही वाल्मिक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता. त्याठिकाणी वाल्मिक कराड दोन ते तीन दिवस होता. लोक रस्त्यावर उतरल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता. वाल्मिक कराडला या रुग्णालयात कोणी ॲडमिट केलं आणि ते अचानक का फरार झाले, याचा तपास झाला पाहिजे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. ते रविवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत भाष्य केले. मला वाटत नाही, आता आंधळे सापडेल. त्या भागात जे काही घडतं, त्या भागाचा जो काही इतिहास आहे, त्यावरुन आंधळे सापडेल असे वाटत नाही. पोलिसांना तो सापडायचा असता तर एव्हाना सापडला असता. पण आता तसे वाटत नाही, असे क्षीरसागर यांनी म्हटले.
मी सुरुवातीपासून सीडीआर तपासा असे सांगत होतो. आता त्यादृष्टीने पोलीस तपास करु लागल्यानंतर नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहेत. त्यामुळे तपासाची साखळी जुळत चालली आहे. वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतरही राज्यभरात मोर्चे काढून रोष व्यक्त केला जात आहे. यावरुन वाल्मिक कराडविरोधातील जनभावनेचा अंदाज येतो, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
वाल्मिक कराडला बीड रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट
वाल्मिक कराड याला पोटदुखीच्या त्रासामुळे दोन दिवस बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वाल्मिकला रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाकडून व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याला आरोपींसाठी असलेल्या कोठडीत न ठेवता त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. वाल्मिकला देण्यात आलेल्या या सोयीसुविधांविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आणखी वाचा