बीड: बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटूंबाने आंदोलने केली. त्यानंतर अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला गेला. त्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातो, त्या वाल्मिक कराडच्या नावावरून आणि त्याला राजकीय पाठिंबा असल्याचा आरोप झाला, या घटनेनंतर वाल्मिक कराड फरार होता, त्याने काल पुण्यात सीआयडी ऑफीसमध्ये आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आता आरोपी येऊन आत्मसमर्पण करतो, फरार आरोपीला अटक न होता, तो स्वतःहून शरण आल्यामुळे पोलिसांना तो सापडला नाही, त्यावरून काही सत्ताधारी आणि विरोधकांनी सरकारसह पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, त्याला आज भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'एखादा आरोपी जर शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल तर त्यावर टीका टिपणी करण्यात अर्थ नाही, आतापर्यंत म्हणत होते त्याला पकडत नाही, पकडत नाही. शरण आला तर आता टीका करत आहेत. या प्रकरणातला कोणीही आरोपी सुटणार नाही, योग्य पद्धतीचे पुरावे, चार्जशीत तयार करावी लागतील. गुन्हा दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे तपास सुद्धा करावा लागतो. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागतो पण काहींना टीकाच करायची असते', असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावला आहे. त्याचबरोबर मस्साजोग ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, सरकारवर विश्वास ठेवावा, अशी विनंती मस्साजोगच्या ग्रामस्थांना बावनकुळेंनी केली आहे.
आरोपी शरण आल्यानंतर टीका करणे योग्य नाही. बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते, असंही ते म्हणालेत, तर एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल, तर त्यावर टीका करणे योग्य नाही. कालपर्यंत आरोपीला पकडत नाही, असं म्हणत होते. आता तो शरण आला, तर त्यावरही टीका करतात, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला आहे.
वाल्मिक कराडची तब्येत बिघडली
बीड मधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही, दरम्यान कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे.
काल रात्री सीआयडीने वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला कोठडी मिळाल्यानंतर बीड मधील जेलमध्ये ठेवण्यात आलं. वाल्मिक कराडला रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा त्याने पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे, आत्ता गेल्या दोन तासांपासून सीआयडी चौकशी करते आहे, कस्टडीतील पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडला श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती, डॉक्टरांचे एका पथकाने त्याची तपासणी देखील केली आहे, याची माहिती समोर आली आहे.