Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेला 24 दिवस पूर्ण झाले असले तरीदेखील अद्याप तीन फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिकी कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे.
खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडची आज सकाळपासून सीआयडीकडून चौकशी सुरू होती. वाल्मिक कराडने सकाळी एक सफरचंद खाल्ले होते, दुपारी अडीच ते तीन पर्यंत त्याने जेवण केले नसल्याची माहिती होती, त्याला सकाळी गोळ्या देखील देण्यात आल्या आहेत. वाल्मिक कराडला बीपी, दमा तसेच श्वासनाचा त्रास आहे. शासकीय जेवण नियमित आहे. मात्र, वाल्मिक कराड याने केवळ डाळ भात खाल्ला असल्याची माहिती होती, तर तो तब्येतीचं कारण देऊन चौकशीला टाळाटाळ करत असल्याची टीका केली जात होती.
दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावला गेला
वाल्मिक कराड याला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावला गेला होता. मागच्या दोन दिवसापासून सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड याला कस्टडीत असताना रात्री सुद्धा ऑक्सिजन लावावा लागला होता. कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडला नियमित गोळ्या औषध घ्यावी लागतात, यातच दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला रात्री अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावण्यात आला होता. मागच्या दोन दिवसापासून कस्टडी मध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली, रात्री वाल्मीक कराड यानी खिचडी खाल्ली.
मंत्री धनंजय मुंडे कराडबाबत पहिल्यांदाच बोलले
बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, कुणाचाही राजीनामा मागायचा सध्या असं चाललंय असे धनंजय मुंडेंनी म्हटलं. तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री करा अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात बोलताना मुंडे म्हणाले की, बिनखात्याचं मत्री कसं करता येतं हे शासनाने त्यांच्याकडून संपूर्ण माहिती करुन घ्यावं. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय असेल तो आमचे नेते अजित दादा घेतील, असेही मुंडेंनी म्हटले.
दबावाचा प्रश्नच नाही
बीडमधील पोलीस ठाण्यात अचानक 5 पलंग मागवले, एकंदरीतच याबाबतीत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. या आधीच खाटा मागवल्या आहेत, असे मंत्री धनंजय मुंडेनी म्हटले.तर, तपास यंत्रणांवर दबाव टाकण्याचा विषयच नाही. कारण, हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन देखील होणार आहे, म्हणून माझ्या दबावाचा प्रश्नच नाही, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.