बीड: काही लोक म्हणतात की माझ्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे.  पण या जिल्ह्याने महाराष्ट्राला  एकापेक्षा एक सरस नेते दिले आहेत. पण काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते बुधवारी आष्टी तालुक्यातील साठवण तलाव प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुरेश धस यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पण थेट हल्ला चढवला.

बीड जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील, धनगर समाजाच्या रखमाजी पाटील गावडे, केशरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांच्यासारखे नेते दिले. याच जिल्ह्याने प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या पहाडासारखे नेते दिले. याच जिल्ह्यात शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके आणि विमलताई मुंदडा यांच्यासारख्या नेत्यांची जडणघडण झाली. या जिल्ह्यात आनंद लिमये, राजेश कुमार, सुनील केंद्रे, नवलकिशोर राम, लखमी गौतम, पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी काम केले.  पण जिल्ह्यातील काही राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली. संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली कणखर भूमिका जनतेला आवडली आहे. मी कोणालाच सोडणार नाही, असे तुम्ही म्हणता. जनतेला तुमच्यावर विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील राख माफिया, वाळू माफिया आणि भूमाफियांनाही मकोका लागला पाहिजे. तुम्ही तो लावाल याची आम्हाला खात्री आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले. सुरेश धस यांच्या या वक्तव्याचा रोख धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दिशेने होता.

यावेळी सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने तारीफ केली. सुरेश धस यांनी म्हटले की, 1999 ते 2004 ही पाच वर्षे साहेबांच्या कागदांचे बॉक्स काढून देण्याचे काम करायचो. मी फार छोटा माणूस आहे. फडणवीस साहेब हे विधानपरिषदेचे सदस्य होते. माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही नव्हता. तरी फडणवीस साहेबांनी मला त्यांच्या बाजूला बसवून घेतलं. साहेब माझ्यावर हरळ उगवली होती. 2019 पासून कटकारस्थान करुन माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही दत्त म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिलात. 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊनही तुम्हाला मुख्यमंत्री होता आले नाही. त्यावेळी तुम्हाला कौटुंबिक आणि राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे काम झाले. पण तुम्ही विरोधी पक्षनेता असताना कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोड नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा म्हणजे बिनजोड पैलवान आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.

यावेळी सुरेश धस यांचा उल्लेख 'बाहुबली' असाही केला. साहेब आपण आष्टी तालुक्यातील योनजेसाठी 300 कोटी रुपये दिले. आपण सभागृहात सांगितले सुरेश धस तुम्हाला 300 कोटी रुपये देतो आणि तुम्ही लगेच देऊन पण टाकले. या प्रकल्पामुळे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्याची पाण्याची गरज भागणार आहे.  फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. आता फक्त 3.27 टी एम सी पाणी मंजूर करून द्या, म्हणजे काम होईल. यापुढे  मी राहीन किंवा न राहीन पण या मतदार संघात भाजपचाच आमदार असेल, असे सुरेश धस यांनी म्हटले.

आणखी वाचा

पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ