Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि आरोपी सुदर्शन घुलेला (Sudarshan Ghule) बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोप दिल्याचे समजते. एकीकडे वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती समोर येत असतानाच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवली आहे.
सुरेश धस म्हणाले की, दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याचे मला कळाले. प्रशासन सांगताना इतरांचे नाव सांगत आहेत. पण हा वाद मुख्य दोन टोळ्यांमध्ये झालेला आहे. या दोन टोळ्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, एक जण चप्पल घालत नव्हता आणि दुसरे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपवल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यांमधला हा वाद झालेला आहे. ही मारामारी फार मोठी झालेली नाही. धावाधावी मात्रा सगळ्यांचीच एकमेकांवर झाली होती.
आकाला जेलमध्ये स्वतंत्र जेवण अन् स्पेशल फोन
बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकते. माझी तर माहिती अशी आहे की, आता आकाला जेलमध्ये स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवले जाते. आणि एक स्पेशल फोन ज्यावरून आकाचे डायरेक्ट कनेक्शन परळीतल्या एका फोनशी होते, अशी माहिती मला मिळाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही?
सुरेश धस पुढे म्हणाले की, यात एसपींनी सुद्धा वसच ठेवायला हवा होता. कारण एसपी हे स्वतः हेडक्वार्टरला असतात. हेडकॉटरला असताना देखील जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्या आहेत. पेपरला बातम्या आल्यानंतर याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा या ऐवजी अगोदरच एसपींनी येथे व्हिजिट का केले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. एखाद्या वेळेस आता हे लोक बाहेर मर्डर करून थकले आहे. त्यामुळे आता हे जेलमध्ये मर्डर करणार नाहीत हे कशावरून? असा सवाल देखील सुरेश धस यांनी उपस्थित केला. बीड जेलमध्ये एकूण 45 पोलिसांचा स्टाफ आहे. काही जागा रिक्त आहेत. मग त्या जागा एसपींनी का कळवल्या नाहीत. त्यांनी कळवायला हव्या होत्या ना, असे म्हणत त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यावर निशाणा साधला.
आरोपींना दुसऱ्या जेलमध्ये पाठवायला हवे होते
सुरेश धस पुढे म्हणाले की, जर या जेलमध्ये 15 ते 20 लोकांची मारामारी झाली असती आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरने ते भरून दिले असते का? काही लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार येते. टेलिफोन आतमध्ये पोहोच होतात. स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरवली जात आहे, अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. मग हे आरोपी बीडचे जेलर आणि एसपींनी अमरावती, नागपूर, नाशिक किंवा संभाजीनगरच्या जेलमध्ये पाठवायला हवे होते, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा