Suresh Dhas : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) दोन महिने उलटले तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मस्साजोगचे (Massajog) ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. 25 तारखेला मस्साजोग ग्रामस्थ करणार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावर सविस्तर भाष्य केले आहे.   

Continues below advertisement

सुरेश धस म्हणाले की, मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हातवर करून विश्वास दाखवला आहे. या प्रकरणातील महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आहे.  सायबर सेलमधील दोन तज्ञांची एसटीमध्ये नियुक्ती व्हावी. आरोपींचे फोन कॉल कुणाला झाले आहेत? हे तपासले पाहिजे.  मागील दोन महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासले पाहिजेत. पोलीस अधिकारी महाजन यांची बीड येथे नियुक्ती आहे त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते? या दोन्ही पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा

कृष्णा आंधळे फार शातिर आहे.  आरोपींचे मनोबल वाढविण्यासाठी लोक न्यायालयात येतात.  कृष्णा आंधळे अटक होणे गरजेचे आहे.  रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गीते, गोरख फड यांचे सीडीआर तपासून त्यांना सहआरोपी करा.  शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची यात नियुक्ती केली पाहिजे. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे.  हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नक्की होणार आहे. 

Continues below advertisement

पोलीस अधीक्षक बदलले असले तरी खालची यंत्रणा तीच

चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी 8 मागण्या मांडल्या आहेत.  पोलिसांची देखील चौकशी करा.  नितीन बिक्कड याने धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केली. तो आरोपी कसा होत नाही? आरोपींना फरार करण्यात त्याचा वाटा आहे.  सोमवारपर्यंत मागण्यांवर पूर्ण झाल्या तर ग्रामस्थांचा विश्वास वाढेल. या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या मी कानावर घालणार आहे.  जेल प्रशासनासंदर्भात देखील ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत. जे मदत करत आहेत ते जेल प्रशासनातील लोक निलंबित झाले पाहिजे.  पोलीस अधीक्षक बदलले असले तरी खालची यंत्रणा तीच आहे. 

सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

सुरेश धस पुढे म्हणाले की, पोलीस दल आतापर्यंत आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालत होते. महादेव मुंडे प्रकरणाला 16 महिने झाले आहेत. मुंडे प्रकरणातील आरोपीने त्यांच्या कुटुंबाला धमकी दिली. हे किती खतरनाक लोक आहेत.  देशमुख हत्या संदर्भात मी केज पोलीस ठाण्यात देखील जाणार आहे. पोलीस अधिकारी महाजन या ठिकाणी राहिलाच कसा? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. ग्रामस्थांना मी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार नाही.  त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रविवारी नागपूरला जाणार आहे. त्यावेळी त्यांच्याकडे या संदर्भात चर्चा करेल, असे त्यांनी म्हटले. 

...तर उपोषणाला बसू नका

पंकज कुमावत यांची ॲडिशनल एसपी म्हणून नियुक्ती द्यावी. कृष्णा आंधळेचे घरदार पोलिसांनी का आणले नाही?  आमचा सुंदर माणूस तुम्ही हिरावून घेतला हा चटका मनाला लागला आहे.  उद्याच मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे.  ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.  मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्यावर सकारात्मकता दाखवली तर उपोषणाला बसू नका. आत्मक्लेष म्हणजे साधी गोष्ट नाही, त्यामुळे विनंती आहे.  मी आता यापुढे कारवाई करूनच येणार अन्यथा येणार नाही, असेही सुरेश धस यांनी म्हटले. 

जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट

जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. त्याचे सीसीटीव्हीसह पुरावे आहेत. वाल्मिक कराडला चहा कोण आणून देत आहे? जेवण कोण आणून देत आहे? काही लोकांना मटण कसे पोहोचते? अशा प्रकारचे पुरावे आहेत. आरोपींना मोठी बॅग कोण नेऊन देत आहे? जे कर्मचारी यात जबाबदारी असतील त्यांना निलंबित करावे, ही ग्रामस्थांची मागणी असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family: धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेध धस पहिल्यांदाच मस्साजोगात पोहचले; धनंजय देशमुख म्हणाले...