Satish Bhosale : भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई याने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर त्याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहेत. आता सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे.  तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी म्हटले आहे की, आमच्या परिसरात प्रचंड प्रमाणात हरणांचा वावर आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर आणि ससा यांची संख्या कमी झाली आहे. दिवसाढवळ्या हरणाची शिकार केली जात आहे. परिसरात शेकडा हरणांचा वावर असताना ही हरणं कुठे गेली? ती हरणं यांच्या पोटात गेले की काय? असा माझा संशय आहे. सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी हरणांची तस्करी करून त्याचा पैसा जमा करत असल्याने कदाचित त्यांच्याकडे सोनं, आलिशान गाड्या असू शकतात, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

खोक्यासारख्या गुंडांवर मोक्का लावावा 

माऊली शिरसाट पुढे म्हणाले की, सतीश भोसले यांचे परिसरात मोठी दहशत आहे. त्यांची मारण्याचे पद्धत म्हणजे एखाद्याचा मारतानाचा व्हिडिओ काढून तो दुसऱ्या लोकांना दाखवायचा आणि माझं कोणी घरी करू शकत नाही. माझं पोलीस काही करू शकत नाही, अशी आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, तो कोणाच्या जीवावर दहशत करतोय. त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याच्या दादागिरीतून शिरूर तालुका भयमुक्त करावा. खोक्यासारख्या गुंडांवर मोक्कासारखा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.   

कोण आहे सतीश भोसले? 

सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सतीश भोसले याची चर्चा होत आहे. 

आणखी वाचा