बीड: राज्यभरात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घ्यावा, असा एका मागण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला वाचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात, वाल्मिक कराड (Walmik Karad) धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणीही वेळोवेळी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडविरोधात (Walmik Karad) राज्यभरात रोष वाढत असतानाच बीडमध्ये घडामोडींना वेग आला आहे, तर धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न आणि इतक कामे आधी वाल्मिक कराड (Walmik Karad)पाहत होता, ती कामे आता मुंडेंचे भाऊ अजय मुंडे (Ajay Munde) करत असल्याची माहिती आहे.


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संतोष देशमुख अपहरण, हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. त्याची या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. या दरम्यान वाल्मिक कराडचं परळीतील जगमित्र या कार्यालयाची सूत्रे आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. याच कार्यालयातून वाल्मिक कराड नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे सांभाळत आहेत. मतदारसंघातील कामे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सध्या ते जाणून घेत असल्याची माहिती आहे.


कोण आहेत अजय मुंडे?


धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते पद देखील त्यांच्याकडे आहे. पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीत मतदारसंघात ते कामे पाहत होते. सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत असताना जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोण कोणाच्या हातात जाणार याबाबतची चर्चा होती. मात्र, अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.


धनंजय मुंडे जेव्हा मतदारसंघात नसत किंवा काही कामांसाठी ते मतदारसंघाबाहेर असत तेव्हा त्यांचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वाल्मिक कराड हजर होता. मात्र मागील दीड गेल्या महिन्यांपासून जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोण हातात घेणार असा प्रश्न होता. आता अखेर याच कार्यालयाची सूत्रे अजय मुंडेंकडे देण्यात आलेली आहेत. 


संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच त्याच्या आणि दोन्ही पत्नीच्या नावे अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले असून कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे. त्यामुळे आता कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.